🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड
कोल्हापूर:- दसरा सणानिमित्त पालखी सोहळ्यासाठी हनुमान मंदिराच्या मैदानावर थांबलेल्या तरुणाला शिवीगाळ करून पाच जणांनी एकत्रितपणे मारहाण केल्याची घटना कामेवाडी (ता. चंदगड) येथे घडली. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला व उजव्या पायाला दुखापत झाली असून, लोखंडी रॉड, धारदार वस्तू आणि हातातील कड्याचा वापर करून हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिक प्रकाश पाटील (वय २४, रा. कामेवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समर्थ पाटील, पवन मुतनाळे, कुमार (पूर्ण नाव माहीत नाही), अविनाश पाटील आणि आकाश पाटील (सर्व रा. कामेवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुंडलिक पाटील हे आपले मित्र अजित शिरगे आणि शुभम पाटील यांच्यासोबत दसरा सणानिमित्त होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी हनुमान मंदिराच्या मैदानावर थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.त्यानंतर काही वेळाने पुन्हा आलेल्या संशयितांनी पुंडलिक यांच्याशी झटापट सुरू केली. यावेळी एका संशयिताने लोखंडी रॉडने त्यांच्या उजव्या पायावर मारहाण केल्याचा आरोप आहे. इतरांनी एकत्र येऊन त्यांना मारहाण केली. एका संशयिताने हातातील कड्याने त्यांच्या नाकावर मारल्याने दुखापत झाली, तर दुसऱ्याने हाताच्या ठोशांनी मारहाण करून त्यांना पकडून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच धारदार वस्तूने पाठीवर वार केल्याचा आणि गळा दाबून मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या घटनेनंतर जखमी पुंडलिक पाटील यांनी गडहिंग्लज येथील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर दिलेल्या जबाबावरून २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८.५३ वाजता चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.



