🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी अजगरभाई मुल्ला
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विनापरवाना गौण खनिज वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर मेहुणबारे पोलिसांनी पहाटे कारवाई करत तब्बल ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यावेळी स्वराज ७४४ XT N कंपनीच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीतून शासनाच्या गौण खनिज वाळूची अंदाजे एक ब्रास विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ ट्रॅक्टर-ट्रॉलीसह वाळू जप्त केली. जप्त वाहनाची अंदाजे किंमत ६ लाख ५० हजार रुपये, तर वाळूची किंमत ६ हजार रुपये असून एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
याप्रकरणी ट्रॅक्टर चालक जयेश योगेश सूर्यवंशी व वाहनमालक दीपक दिनकर महाले (दोघेही रा. शिरसाड, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अवैध गौण खनिज उत्खनन आणि विनापरवाना वाहतुकीविरोधात मेहुणबारे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.



