🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर :- अल्पवयीन मुलीचे अपहरण व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. वृषभ बाहुबली शंकरगोडा (वय २५, रा. पाटील गल्ली, आलारवाडी, बेळगाव, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २ हजार रुपये दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १११/२०२१ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ व ३७६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची विशेष केस क्रमांक १२४/२०२१ अशी होती.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. जाधव यांनी केला. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या देखरेखीखाली तपास व न्यायालयीन कामकाजाची प्रक्रिया पार पडली. जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर येथील न्यायालय क्रमांक ३ चे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. पेरमपल्ली यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. कुलकर्णी यांनी काम पाहिले.न्यायालयीन कामकाजासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल तळेकर , पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.



