DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : राजेंद्र पवार
मिरज :- कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर ते बामणोली-विजयनगर दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. दुचाकी घसरून थेट पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली गेल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या. या अपघातात एका महिलेच्या दोन्ही पायांवरून ट्रक गेल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या अपघातात रेवती फराटे (वय ४३, रा. विजयनगर) आणि धनश्री शेंडगे (वय ३२, रा. बामणोली) या जखमी झाल्या आहेत. दोघीही दुचाकी (क्र. एमएच १० डीएम ७५०९) वरून कुपवाड रोडने प्रवास करत होत्या. लक्ष्मी मंदिर चौकात रस्त्याचे खोदकाम, मुरूम आणि सिमेंट काँक्रीटचे काम सुरू असल्याने रस्ता खडबडीत व घसरडा झाला होता. याच ठिकाणी अचानक दुचाकीचा ताबा सुटल्याने वाहन घसरले आणि दोघी ट्रकच्या मार्गात आल्या.
अपघाताच्या क्षणी पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली दुचाकी अडकली. रेवती फराटे यांच्या दोन्ही पायांवरून ट्रक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर धनश्री शेंडगे या बाजूला फेकल्या गेल्याने त्यांनाही गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काहींनी तत्काळ रुग्णवाहिकेला फोन करून मदत मागवली.
जखमी दोन्ही महिलांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार रेवती फराटे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही सूचना फलक, अडथळे किंवा वाहतूक नियंत्रण नसल्याने अपघातांची शक्यता वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झालेली नव्हती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



