DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- राजेंद्र पवार
सांगली मिरज: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी ‘महाविस्तार AI’ हा डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. “शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र” या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेले हे चॅटबॉट-आधारित प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रश्नांची तत्काळ व अचूक माहिती उपलब्ध करून देणार आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना कृषी अधिकारी श्री. राहुल माने यांनी सांगितले की, बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य वेळी तांत्रिक मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. महाविस्तार AI मुळे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज, कीड-रोग नियंत्रण, खत मात्रा यासारखी महत्त्वाची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, QR कोड स्कॅन करून किंवा Play Store वरून ‘महाविस्तार AI’ अॅप डाउनलोड करून शेतकरी या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
महाविस्तार AI मधून उपलब्ध सुविधा :
पीक वाढीच्या टप्प्यानुसार सल्ला
हवामानाचा अचूक अंदाज
मृदा आरोग्य पत्रिका माहिती
खत मात्रा गणक
माहितीपूर्ण व्हिडिओ व शेतीशाळा
हवामान अनुकूल तंत्रज्ञान
कीड व रोग ओळख व उपाय
सर्व पिकांचे बाजारभाव
स्थानिक सुविधा – गोदाम, अवजार बँक आदींची माहिती
श्री. माने यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाविस्तार AI चा अधिकाधिक वापर करावा, जेणेकरून शेती अधिक उत्पादक, खर्चिकदृष्ट्या फायदेशीर आणि आधुनिक बनू शकेल.



