DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : राजेंद्र पवार
मिरज : शहरातील दिंडीवेस परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करून वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पुरवठा विभागाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले असून मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालय मिरजच्या पथकाने दिंडीवेस परिसरातील एका शेडवर छापा टाकला. सदर शेड श्रीमती वंदना गजानन सुतार यांच्या मालकीची असून तेथे कामगार लियाकत कमाल नदाफ (रा. सुभाषनगर, मिरज) हा घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना आढळून आला. कारवाईदरम्यान पथकाने दोन घरगुती गॅस सिलेंडर, दोन इलेक्ट्रिक मोटार, दोन वजन काटे, दोन गॅस नोझल, तीन गॅस पाइप तसेच दोन भारत पे क्यूआर कोड यांसह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी संबंधितांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली. तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध गॅस रिफिलिंग किंवा इतर बेकायदेशीर प्रकारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.



