DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – सचिन देसाई
इचलकरंजी :- सातबारा पत्रिकेत वडिलांचे नाव लावून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ग्राम महसूल अधिकारी आणि उपसरपंचाला रंगेहात पकडल्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. करवीर तालुक्यातील शिंगणापूर सज्जा येथील ग्राम महसूल अधिकारी इरफान दिलावर सनदी (वय ४१) यांनी तक्रारदाराकडून सातबारा पत्रिकेत वडिलांचे नाव लावण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे (वय ४३) यांच्या मार्फत देण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
तक्रारदाराने याबाबत ४ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता आरोपींनी १० हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करून ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर ५ मार्च २०२६ रोजी शिंगणापूर तलाठी कार्यालयात सापळा कारवाई करण्यात आली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच रक्कम घेताना उपसरपंच दीपक कांबळे यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. ही रक्कम कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगण्यात आली होती.
कारवाईदरम्यान आरोपींची अंगझडती घेण्यात आली असून लाच रक्कम ५ हजार रुपये जप्त करण्यात आलेली आहे.आरोपी इरफान सनदी यांचा सॅमसंग कंपनीचा A23 मोबाईल व दिपक कांबळे यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
आरोपींच्या शिंगणापूर व कोल्हापूर येथील घरांची झडती घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून झडतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ व ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार संदीप काशिद, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार, कृष्णा पाटील व गजानन कुराडे यांचा समावेश होता.



