DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी संजय दिंडे
कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका मोठ्या चोरीचा छडा लावत घरकाम करणाऱ्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. संशयितांकडून ७ लाख २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.यातील फिर्यादी राहुल नारायण हावळ (वय ३९, रा. भारत हाउसिंग सोसायटी, राजारामपुरी ७ वी गल्ली) यांच्या घरी ९ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही चोरी झाली होती. राहत्या घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी तपासाचे चक्र फिरवत गुन्हे शोध पथकाचे अमोल पाटील आणि शाहू तळेकर तपास दरम्यान हावळ यांच्या घरी कामाला असलेल्या वैशाली सिद्धाप्पा भुमन्नावार (रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) हिनेच हे दागिने चोरले असल्याचे दाट संशय आला. महिला पोलीस अंमलदार वंदना डोंगळे यांच्या मदतीने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली.
चोरलेले दागिने वैशालीने तिचा प्रियकर रवी सिद्धाप्पा मेलगुडे (वय ३३, रा. मुन्याळ, जि. बेळगाव, कर्नाटक) याला विकण्यासाठी दिले होते. पोलिसांनी तातडीने मुन्याळ येथे जाऊन रवी मेलगुडे याला ताब्यात घेतले. त्याने हे दागिने मुथुट गोल्ड मनी फायनान्स आणि मुथुट फिनकॉर्पमध्ये गहाण ठेवून त्यावर पैसे उचलले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून ७ लाख २२ हजार रुपये किमतीचे ३२ ग्रॅमचे मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, चेन, सोन्याची पाने आणि नथ असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सचिन देसाई, अमोल पाटील, शाहू तळेकर, विशाल शिरगावकर, सुशांत तळप, संदीप सावंत, सत्यजित सावंत, गजानन हराळे, प्रियंका जनवाडे आणि ऋतू कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. सचिन देसाई करत आहेत.



