DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- नारायण कांबळे
इचलकरंजी : शहरात दिवसाढवळ्या घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल चोरट्यास इचलकरंजी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाईल कारवाई करत दोन साथीदारांसह जेरबंद केले. या कारवाईत तब्बल ६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुदती टाकवडे परिसरातील एका घरात चोरीची घटना घडली होती. घरमालक बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली होती. या घटनेनंतर इचलकरंजी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढला.
तपासादरम्यान आरोपी विनायक गणपत कुंभार,(वय २९ रा.लिंगनगुडी मंदिर गावभाग) , लक्ष्मीकांत उर्फ तमां सैदु नाटेकर (वय३१रा. विठ्ठल नगर शहापूर) अनिल कासाप्पा कल्याणी (वय २८ रा. विठ्ठल नगर शहापूर ) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली इचलकरंजी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहा. पोलीस गोविंदा कोळेकर, पो. कॉ. अनिल पाटील,उदय करडे, फिरोज बेग,अमर शिरढोणे, विजय माळवदे, बाजीराव पवार, प्रमोद आंबी या पथकाने केली.
शहरात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलीसांच्या कारवाई कौतुक होत आहे.



