DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी: संजय दिंडे
कोल्हापूर शहर: कोकण दर्शनासाठी गेलेल्या मित्राच्या बंद घराची रेकी करून स्वतःच्याच मित्राने घरफोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून १२० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह एकूण १५,५६,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोकण दर्शनाची संधी साधली
पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील फिर्यादी हे ६ मे २०२६ रोजी कुटुंबासह कोकण दर्शनासाठी गेले होते. हीच संधी साधून त्यांच्या बंद घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरण्यात आली होती. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते.
हॉकी स्टेडियमजवळ सापळा
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, सत्यजित तानगुडे व महेंद्र कोरवी यांना गोपनीय माहिती मिळाली की, या चोरीतील सोन्याचे दागिने विकण्यासाठी एक इसम कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियमजवळ येणार आहे.
त्यानुसार पोलिसांनी
तात्काळ सापळा रचून सिद्धार्थ संजय भालकर (वय २३, रा. बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता १५,६०,५०० रुपये किमतीचे १२० ग्रॅम सोन्याचे दागिने व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पैशांच्या नडीपायी मित्रच निघाला ‘मास्टरमाईंड’
आरोपी सिद्धार्थ भालकरकडे कसून चौकशी केली असता, फिर्यादीचा मित्र केदार पाटील यानेच हा संपूर्ण कट रचल्याचे समोर आले. केदारला पैशांची अत्यंत गरज असल्याने, त्याने मित्राचे कुटुंब बाहेर गावी गेल्याचा फायदा उठवून घरात चोरी केली आणि ते दागिने विकण्यासाठी सिद्धार्थकडे दिले होते.
अटक केलेल्या सिद्धार्थ भालकरला पुढील तपासासाठी करवीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, मुख्य सूत्रधार केदार पाटील आणि त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
या पथकाने केली कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, सत्यजित तानगुडे, महेंद्र कोरवी, संतोष बरगे, गजानन गुरव, विशाल खराडे, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, अरविंद पाटील आणि अनिल जाधव यांनी केली आहे.



