DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी राजेंद्र पवार
म्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे सुरू असलेल्या एका आलिशान बारवर मिरज ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा धडक कारवाई करत छापा टाकला. कोल्हापूरसह परजिल्ह्यातील तरुणींना बोलावून ग्राहकांना कथित ‘व्हीआयपी सर्व्हिस’ पुरवली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
छाप्यादरम्यान बारमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काही तरुणी सेवा देताना आढळून आल्या. तसेच दारूच्या नशेत असलेल्या काही तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून संबंधितांचे जबाब नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
प्राथमिक तपासात संबंधित ठिकाणी डान्सबार स्वरूपाचे प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परजिल्ह्यातील तरुणींना खासगीरित्या बोलावून त्यांच्याकडून सेवा घेतली जात असल्याची माहितीही समोर येत आहे. याप्रकरणी बारचा परवाना, तेथील व्यवस्थापन, तरुणींची ओळख तसेच त्यांना कोणी आणि कशासाठी बोलावले याचा सखोल तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.
या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हॉटेल व बार व्यावसायिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. संबंधित बारचालकाविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
“हायफाय बारच्या आड सुरू होता संशयास्पद कारभार? मध्यरात्रीच्या पोलिस कारवाईने म्हैसाळ हादरले!”



