DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर : शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी लोकसेवक दगडू चंद्रप्पा कुंभार (वय ५२) यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या घटनेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरजिल्हा बदलीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये रुजू झालेल्या एका शिक्षकाच्या वेतनातील फरक काढून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तब्बल ४० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्याने तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची तयारी केली. मात्र पंच साक्षीदारांसमक्ष तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिल्याने प्रत्यक्ष सापळा कारवाई झाली नाही. तरीही चौकशीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.लाच मागणाऱ्या किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याविषयी माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



