DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- राजेंद्र पवार
मिरज : अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी मिरज ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत गांजा बाळगणाऱ्या एका इसमाला बेड्या ठोकल्या. या कारवाईत तब्बल २ किलो ३०५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत ५७ हजार ६२५ रुपये इतकी आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी अंमली पदार्थांविरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ६ जून रोजी सुभाषनगर परिसरात गस्त सुरू असताना खास बातमीदारामार्फत पोलिसांना संशयित इसम गांजा घेऊन थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता परिसरात सापळा रचला आणि संशयितास ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याच्या ताब्यातील पुठ्ठ्याचा बॉक्स उघडून पाहिला असता निळ्या प्लास्टिक पिशवीत लपवून ठेवलेला हिरवट-काळपट रंगाचा गांजा आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महादेव सिताराम शिंदे (वय ४०, रा. बेवनूर, ता. जत, जि. सांगली) असे असून, त्याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(२)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडक कारवाईत पोउपनि पांडुरंग मुंडे, रावसाहेब सुतार, अमोल ढोले, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, राहुल देशमुख, दिपाली केंद्रे, रामचंद्र शिंदे आणि स्वप्नील भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अंमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांवर मिरज ग्रामीण पोलिसांचा करडा बडगा कायम असून, गुन्हेगारीविरोधातील ही मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.



