DPT NEWS NETWORK
🚨दर्शन पोलीस टाइम🚨
⭐धुळे:- धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सुट्या खाद्यतेलाच्या बेकायदेशीर विक्रीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच भेसळखोरांविरोधात अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. त्यांच्या या धडक कारवाईचा थेट परिणाम आता धुळे जिल्ह्यात स्पष्टपणे पाहण्यास मिळत असून, गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील सुट्या खाद्यतेलाची होलसेल विक्री पूर्णपणे बंद झाली आहे.
आरोग्याशी खेळ थांबला; नियमांची कडक अंमलबजावणी
अन्न सुरक्षा नियमांनुसार, खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंद (Sealed) आणि योग्य लेबलयुक्त पॅकिंगमध्येच करणे बंधनकारक आहे. असे असतानाही, धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून राजरोसपणे उघड्या स्वरूपात (सुट्या) तेलाची विक्री करत सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळले जात होते. अशा सुट्या तेलामध्ये भेसळीचा मोठा धोका असतो, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर आणि दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. आयुक्त मुंडे यांच्या आदेशानंतर या प्रकाराला कायमचा चाप बसला आहे.
अवधान एमआयडीसीमधील कारवाई ठरली टर्निंग पॉईंट
काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धुळ्यातील अवधान एमआयडीसी (MIDC) परिसरात एक मोठी धडक कारवाई केली होती. या धडक कारवाईमुळे भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईच्या धास्तीमुळेच सध्या बाजारातून सुटे तेल जवळपास पूर्णपणे गायब झाले आहे.
⭐ग्राहकांकडून छोट्या पॅकेट्सची मागणी⭐
सुट्या तेलाची विक्री बंद झाल्याने अन्न सुरक्षेचा प्रश्न सुटला असला, तरी सर्वसामान्य आणि गरीब ग्राहकांची अडचण होऊ नये म्हणून एक नवी मागणी पुढे येत आहे. सुटे तेल घेणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी बाजारात १ लिटरपेक्षा कमी क्षमतेची (उदा. २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम) तेलाची सीलबंद पाकिटे/सॅशे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आता धुळ्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
एकंदरीत, आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या या धडक मोहिमेमुळे धुळेकरांना आता शुद्ध आणि सुरक्षित खाद्यतेलापासून तर इतर खाद्य पदार्थ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे सुजाण नागरिकांमधून स्वागत होत आहे.



