DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी संजय दिंडे
कागल : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत ते लक्ष्मी टेकडी दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (दि. ९ जून) सकाळी सापळा रचून अवैध भेसळयुक्त ताडीची वाहतूक करणारी इनोव्हा कार जप्त केली. या कारवाईत २८० लिटर भेसळयुक्त ताडी, कार व मोबाईल असा एकूण ५ लाख ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
⭐गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
राज्य उत्पादन शुल्क कागल विभागाचे जवान लक्ष्मण येडगे यांना एका पांढऱ्या रंगाच्या टोयाटा इनोव्हा कारमधून (क्रमांक MH 09-AV-9393) विनापरवाना व मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या भेसळयुक्त ताडीची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कागलचे निरीक्षक शंकर सीताराम आंबेरकर, सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक सुधीर विष्णू भागवत, वाय. एस. शिर्के व जवान लक्ष्मण येडगे यांनी दोन खाजगी वाहनांद्वारे कागल-लक्ष्मी टेकडी रोडवरील हॉटेल पल्लवी समोर मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास सापळा रचला.
संशयित इनोव्हा कार येताच अधिकाऱ्यांनी ती बाजूला थांबवून झडती घेतली. यावेळी कारमध्ये निळ्या रंगाचे ६ आणि पिवळ्या रंगाचे २ असे एकूण ८ प्लास्टिक कॅन आढळून आले. यात सुमारे २८० लिटर अवैध भेसळयुक्त ताडी भरलेली होती.
⭐मुद्देमाल जप्त, आरोपींना पोलीस कोठडी
या प्रकरणी साकेत प्रदीप बोर्लीकर आणि नितीन बाजीराव माने या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून २८० लिटर ताडी, इनोव्हा कार आणि व्हीओ कंपनीचा एक मोबाईल संच (Airtel सिमकार्डसह) असा एकूण ५,७८,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या या ताडीची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९’ आणि ‘विष नियमावली १९७२’ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
⭐वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथक
सदरची यशस्वी कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूरच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत निरीक्षक शंकर सीताराम आंबेरकर, दुय्यम निरीक्षक सुधीर विष्णू भागवत, वाय. एस. शिर्के आणि जवान लक्ष्मण येडगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक आंबेरकर स्वतः करत आहेत.
⭐जनतेला आवाहन: बेकायदेशीर दारूची येथे तक्रार करा
कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, कुठेही अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्री सुरू असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल:
टोल फ्री क्रमांक: 18002339999
व्हॉटसअॅप क्रमांक: 8422001133
दूरध्वनी क्रमांक: 0231-2546025
ई-मेल: stateexcisekop@gmail.com



