DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर – कोल्हापूर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शकुंतला विजय कोल्हापूरे (वय 74, रा. अंबाई टँक, रंकाळा, कोल्हापूर) या 11 जून रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास इस्कॉन मंदिर परिसरातून भाजीपाला घेऊन घरी जात होत्या. त्या नवनाथ अपार्टमेंटसमोर रस्त्यावर आल्या असता काळ्या रंगाच्या यामाहा एफझेडसारख्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले.यावेळी मोटार
सायकलच्या मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे 18 ग्रॅम वजनाचे व सुमारे 1 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र जोराने हिसकावून घेतले आणि दोघेही मोटारसायकलवरून वेगाने पसार झाले.चोरट्यांचे वय अंदाजे 19 ते 24 वर्षे असून त्यापैकी एकाने गुलाबी-पांढऱ्या चेक्सचा शर्ट तर दुसऱ्याने काळ्या किंवा निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. दोघेही स्पोर्ट्स शूज घातलेले होते.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 309(4) व 3(5) अन्वये जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे करीत आहेत.



