🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाइम🚨
धाराशिव (प्रतिनिधी परवेज शेख) : येरमाळा–येडशी मार्गावर अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला येडशी टोल नाक्यावरील रास्ता रोको आंदोलनामुळे अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, धाराशिव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वायूवेग पथकाने तत्परता दाखवत रुग्णवाहिकेला पायलटिंग करून सुरक्षित मार्ग मोकळा केला आणि जखमीला वेळेत धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
नेमकी घटना काय घडली?
दि. १६ नोव्हेंबर रोजी येरमाळा ते येडशी मार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर धाराशिव आरटीओचे वायूवेग पथक नियमित गस्त व फ्लाइंग ड्युटीवर होते. याच दरम्यान एका दुचाकीचा अपघात होऊन एक व्यक्ती गंभीर/जखमी झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला प्राथमिक मदत केली आणि तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यात दाखल केले.
‘गोल्डन अवर’मध्ये पायलटिंग करत मार्ग मोकळा
जखमीला पुढील उपचारासाठी धाराशिवकडे नेत असताना येडशी टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याने रुग्णवाहिकेचा मार्ग रोखला जाण्याची शक्यता होती. अपघातग्रस्ताच्या उपचारासाठी सुरुवातीचा वेळ म्हणजेच ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. ही बाब ओळखून वायूवेग पथकाने स्वतःच्या वाहनातून रुग्णवाहिकेला पायलटिंग केले. आंदोलनस्थळावरून मार्ग काढत रुग्णवाहिका सुरक्षितपणे धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचवण्यात आली.
या पथकाने बजावली महत्त्वाची कामगिरी
या संपूर्ण कार्यवाहीत मो. वा. नि. सुनील शिंदे, स. मो. वा. नि. मेहबूब सय्यद आणि वाहनचालक गोरख बोधले यांनी प्रसंगावधान राखत कामगिरी पार पाडली. शासकीय कर्तव्य बजावत असताना मानवी जीवनाला प्राधान्य देत केलेल्या या तत्परतेबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.



