🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर :- इचलकरंजी शहरा लगत असलेल्या कोरोची बेकरी दुकानात तंबाखूची पुडी खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून लंपास केल्याची घटना कोरोची (ता. हातकणंगले) येथे (२१ सप्टेंबर) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत गुंजना सुरेश चव्हाण (वय ३९, रा. चव्हाणवाडी, कोरोची) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध गु.र.नं. ४७७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गुंजना चव्हाण या चव्हाणवाडी परिसरातील आपल्या बेकरी दुकानात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून दुकानाजवळ आले. त्यापैकी एक इसम मोटारसायकलवरून खाली उतरून दुकानात आला आणि त्याने तंबाखूची पुडी मागितली.
तंबाखूची पुडी घेण्यासाठी त्याने फिर्यादी यांना ५० रुपयांची नोट दिली. फिर्यादी यांनी त्याला १० रुपयांची तंबाखूची पुडी दिल्यानंतर उर्वरित पैसे परत देण्यासाठी दुकानातील काऊंटरजवळील ड्रॉवर उघडत असतेवेळी . याच क्षणी संधी साधत संबंधित इसमाने त्यांच्या गळ्यातील मिनी मणी मंगळसूत्रावर जोराचा हिसका मारला.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे फिर्यादी यांना काही कळण्यापूर्वीच आरोपीने मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर तो दुकानाबाहेर पळत गेला आणि बाहेर मोटारसायकलवर थांबलेल्या साथीदारासह दोघांनी कोरोची रोडच्या दिशेने धूम ठोकली.
हिसका मारून चोरून नेलेल्या मंगळसूत्राची किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मंगळसूत्रामध्ये काळे मणी, दोन वाट्या व घस असलेले अंदाजे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मणी मंगळसूत्र होते.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, दुकानात आलेल्या ग्राहकाच्या वेशात चोरट्यांनी महिलेचे दागिने लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही आरोपींचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या मोटारसायकलचा मार्ग आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक वडगांवे करीत आहेत.



