🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी विराज गंगावणे
नवी मुंबई:- नवी मुंबईतील वाशी परिसरातून ‘दैनिक नवे शहर’चे ५२ वर्षीय संपादक शैलेश सुंदर जाधव हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत। त्यांच्या पत्नी मेघना जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १४०(३) (अपहरण) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश जाधव हे २१ सप्टेंबर रोजी कामावर जाण्यासाठी घरातून निघाले होते। संध्याकाळी साधारण सातच्या सुमारास त्यांनी पत्नीला फोन करून ते वाशी येथील नवरत्न हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले, मात्र त्यानंतर ते उशिरापर्यंत घरी परतले नाहीत आणि त्यांचा फोनही बंद येऊ लागला। दरम्यान, त्यांच्या एका मित्रानेही त्यांना त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास नवरत्न हॉटेलजवळ पाहिले होते।
कुटुंबीयांनी ऐरोली, कोपरखैरणे, रबाळे, वाशी रेल्वे स्थानक परिसर आणि सर्व नातेवाइकांकडे कसून शोध घेतला, परंतु त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही। अखेर त्यांच्या पत्नीने २२ सप्टेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली। पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास हेड कॉन्स्टेबल अशोक बाबन कचरे यांच्याकडे सोपवला असून पोलीस पथके संपादकांचा शोध घेत आहेत.



