🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी दौलत पाटील
भिडी, ता. देवळी : पुलगाव–भिडी मार्गावरील एसटी बस पूर्वी नियमितपणे दिवसातून दोन वेळा भिडी गावात येत होती. मात्र, गावातील रस्त्याची अवस्था खराब झाल्याने काही काळासाठी बस सेवा गावात बंद करण्यात आली होती. आता रस्त्याचे काम पूर्ण होऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असतानाही बस अद्याप गावात न येता बाहेरच थांबवली जात असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
या संदर्भात पारस चोरे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी संबंधित एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून बस पूर्वीप्रमाणे गावात सुरू करण्याची मागणी केली. अनेक वेळा तोंडी व लेखी सूचना देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दररोज शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर उतरावे लागत असून पायी चालत गावात जावे लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
“रस्ता पूर्णपणे दुरुस्त झाला असताना बस गावात न आणण्याचे कारण काय? प्रशासनाने तातडीने पुलगाव–भिडी बस पूर्ववत गावात सुरू करावी. अन्यथा नागरिक व विद्यार्थ्यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा पारस चोरे यांनी दिला आहे.
आता परिवहन प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेऊन बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



