🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज :- मिरज शहरातील एसटी स्टँड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांनी सोमवारी धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई करत २२ जणांना ताब्यात घेतले. या धडक कारवाईमुळे शहरातील जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी जुगाराच्या अवैध व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी अनेक जण पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. कारवाईदरम्यान पत्त्यांचे संच, मोबाईल फोन तसेच इतर महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले.
प्राथमिक चौकशीत हा जुगार अड्डा अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या व्यवसायातून किती आर्थिक उलाढाल होत होती आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांची कसून चौकशी सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चोगले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मिरज शहरातील बेकायदेशीर जुगार व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे.



