८३ वाहनचालकांवर कारवाई; ₹७६,२५० दंड वसूल, ८ अल्पवयीन चालकांकडून ₹४० हजारांचा दंड
🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी-राजेंद्र पवार
मिरज :- मिरज शहरात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी (दि. २१ जुलै) विशेष मोहीम राबवत बेशिस्त वाहनचालक, रोड रोमिओ आणि अल्पवयीन वाहनचालकांविरोधात धडक कारवाई केली. या मोहिमेत ९८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून ८३ वाहनचालकांवर कारवाई करून ₹७६,२५० इतका दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे, विनापरवाना वाहन चालविणारे, रोड रोमिओ तसेच अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.
याशिवाय ट्रिपल सीट प्रवास, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन परवाना जवळ न बाळगणे, धोकादायक पद्धतीने मालवाहतूक करणे, मॉडिफाई सायलेन्सरचा वापर तसेच सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान ८ अल्पवयीन वाहनचालक आढळून आले. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत ₹४०,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी पालकांना इशारा देत सांगितले की, १८ वर्षांखालील आणि वाहन परवाना नसलेल्या मुलांना वाहन चालविण्यास देणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये संबंधित पालकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी जबाबदारीने वागून अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ तसेच वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी केली.
दरम्यान, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित व अपघातमुक्त मिरज घडविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी केले आहे.



