DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी पांडुरंग माने
टेंभुर्णी – कौटुंबिक वादातून संताप अनावर झाल्याने वडिलांनीच आपल्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना रुई (ता. माढा) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी आरोपी वडिलांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहिती अशी आहे की, दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7.45 वाजण्याच्या सुमारास रुई येथील पोलीस पाटील यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याला माहिती दिली की, विश्वजीत उर्फ पिलो राजेंद्र पतंगे (वय 25) हा त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पाहणी केली असता, मयत विश्वजीत याच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर मारहाण झाल्याचे आढळले. शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
गोपनीय चौकशीतून समोर आले आहे की, मयत विश्वजीत याने पूर्वी आपल्या वडिलांना मारहाण केली होती. तसेच घटनेच्या आदल्या दिवशी शेतातील पाणी देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये फोनवरून वाद व शिवीगाळ झाली होती. याच रागातून वडील राजेंद्र भानुदास पतंगे (वय 60) याने दि. 27 मार्च 2026 रोजी रात्री 11.30 वाजता सुमारास झोपेत असलेल्या मुलावर म्हशीच्या लोखंडी मेकने डोक्यावर व तोंडावर वार करून त्याचा खून केला. संबंधित प्रकरणी मयताची आई व आरोपीची पत्नी सौ. राजश्री राजेंद्र पतंगे (वय 42) यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 197/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.



