DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – सचिन देसाई
इचलकरंजी येथील सांगली रोड परिसरातील एका जागेत करण्यात आलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खननाप्रकरणी महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेश कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेत, अपर तहसीलदारांनी संबंधित मिळकत धारकावर ९३ लाख ७२ हजार २०० रुपयांचा दंडात्मक बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
काय आहे प्रकरण?
सांगली रोड परिसरातील मिळकत (रि.स.नं. ६३६/३ब, सि.स.नं. १७७१९) मध्ये अल्लाबक्ष गुलाबसाहेब बारगीर यांनी मुरुम उत्खनन केले होते. यासाठी त्यांनी प्रशासनाकडून केवळ ६८० ब्रासची परवानगी घेतली होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत या जागेवर १०० फूट लांबी, ११० फूट रुंदी आणि २० फूट खोलीचे मोठे उत्खनन करून सुमारे २२०० ब्रास मुरुम काढल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारीनंतर फेरचौकशीचा आदेश
सुरुवातीला मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात केवळ ५० ब्रास अतिरिक्त उत्खनन दाखवून ४० हजार रुपयांचा दंड आकारला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्ते राजेश कांबळे (न्याय निवाडा लोकनेता फौंडेशन, दिल्ली) यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे दाद मागितली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुन्हा स्थळपाहणी करण्यात आली, ज्यामध्ये १५२० ब्रास अतिरिक्त मुरुम उत्खनन केल्याचे स्पष्ट झाले.
दंडाचा तपशील
मिळकत धारक आणि त्यांचे वटमुखत्यार संतोष आवरटगी यांनी नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्याने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) (८) नुसार खालीलप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे:
रॉयल्टी रक्कम: ९,१२,००० रुपये
भूपृष्ठ भाडे: ९,००० रुपये
DMF (जिल्हा खनिज प्रतिष्ठान): ९१,२०० रुपये
बाजारभावाच्या ५ पट दंड: ८३,६०,००० रुपये
एकूण दंड: ९३,७२,२०० रुपये
“प्रशासनाने सुरुवातीला या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते, मात्र पाठपुरावा केल्यावर सत्य समोर आले आहे. अवैध उत्खनन करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात ही कारवाई महत्त्वाची आहे.”
— राजेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
१५ दिवसांची मुदत
अपर तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार, ही दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आत शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत दंड न भरल्यास जमीन महसुलाची थकबाकी म्हणून सक्तीने वसुली करण्याची तंबीही प्रशासनाने दिली आहे.



