DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी - नारायण कांबळे
कोल्हापूर ता. हातकणंगले इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या अवैध IPL क्रिकेट बेटिंग व्यवसायावर शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ९ जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, चारचाकी वाहने तसेच ऑनलाईन बेटिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ८६ लाख ९३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीतील इंडस्ट्रीज इस्टेट येथील अमेय बडवे यांचे मनिषा एन्टरप्रायजेस या फुटवेअर गोडाऊन मध्ये काहीजण ऑनलाईन IPL क्रिकेट बेटिंग चालवत व खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष तपास पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
या प्रकरणात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान पोलिसांनी विविध कंपन्यांचे २२ मोबाईल हँडसेट, रोख रक्कम, ३ चारचाकी वाहने तसेच ऑनलाईन बेटिंगसाठी वापरले जाणारे १०४ संगणक संच, कि बोर्ड, सीपीयु व इतर साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालामध्ये सुमारे ५४ लाख रुपयांची तीन वाहने, ५ लाख ८० हजार रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाईल, ७० हजार २३० रुपयांची रोख रक्कम आणि इतर साहित्याचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमेय विलास बडवे, गणेश प्रकाश पाटील, अभिजित विलास बडवे, उत्तमसिंग प्रतापसिंह बंगा, याकुब अब्दुल मुजावर उमेश पाटील, ऋषभ उमेश पाटील, नितेश उर्फ गोट्या पवार, मनीष भरत सांगावकर, सचिन सदाशिव हरगापुरे (सर्व रा.इचकरंजी ) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तपासादरम्यान आरोपी हे “park247.com” आणि “park333.com” या संकेतस्थळांच्या माध्यमातून ऑनलाईन क्रिकेट बेटिंग चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून बेटिंगसाठी वेगवेगळ्या नावाने बँक खाती आणि सिमकार्डचा वापर करण्यात येत होता, अशी माहितीही समोर आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाणे P.I. शिवाजी गायकवाड, शहापूर पोलीस ठाणे P.I. गजेंद्र लोहार, हुपरी पोलीस ठाणे सहा.निरीक्षक विकास शिंदे व पो.कॉ प्रमोद भांगरे, महेश खोत,सागर चैगुले, महेश पाटील, रनवीर जाधव,नीतीन जाधव, सद्दाम सनदी, सुकुमार बरगाले व विशेष तपास पथकाने केली. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.



