🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी प्रणय वानखेडे
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील रोठा (तलाव) गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. एका १२ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर तिच्याच जवळच्या नातेवाईकाने पाशवी लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नराधम आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
बदल्याच्या भावनेतून रचला थरकाप उडवणारा कट
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल राजू मडावी (वय ३० वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पीडित कुटुंबाचा जवळचा नातेवाईक असून त्याचे घरात सतत येणे-जाणे होते. तो अनेकदा तिथे दारू पिऊन धिंगाणा घालत असे. घरात तरुण आणि वयात येणाऱ्या मुली असल्याने पीडितेच्या आईने या गोष्टीला कडाडून विरोध केला होता. “घरात मुली आहेत, त्यामुळे इथे दारू पिणे आणि येणे बंद करा,” असे बजावून त्यांनी आरोपीला घरात येण्यास मनाई केली होती.
याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने अत्यंत थंड डोक्याने कट रचला. घटनेच्या दिवशी पीडितेचे आई-वडील शेतात कामावर गेले असताना, आरोपीने पीडितेच्या आईला फोन करून, “आज तुमच्या घरी काय करतो ते बघा, हा दिवस तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील,” अशी थेट धमकी दिली होती. त्यानंतर घरात कोणीही नसताना या नराधमाने अवघ्या १२ वर्षांच्या निष्पाप बालिकेला आपल्या वासनेची शिकार बनवले आणि तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
नागरिक आणि महिला संघटना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
या अमानुष घटनेच्या निषेधार्थ समस्त जनता, महिला संघटना आणि संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर करून प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशी द्या: या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात (जलदगती न्यायालयात) चालवून सबळ पुराव्यांसह आरोपी राहुल मडावी याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी.
पीडित कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत: या अत्यंत क्लेशदायक परिस्थितीत पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत, कायदेशीर संरक्षण आणि मानसिक आधार मिळावा.
महिला व बालिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले: ग्रामीण भागात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत. गावागावांमध्ये रात्रीची गस्त वाढवून अत्याचार विरोधी तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी.
अवैध दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी: ग्रामीण भागात वाढणारी गुन्हेगारी आणि छेडछाडीचे मुख्य कारण ठरणाऱ्या अवैध दारू विक्रीवर आणि नशायुक्त पदार्थांवर पोलिसांनी तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा
दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत्या बलात्कार, हत्या आणि लूटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः रोजमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “जर या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत आणि नराधमाला कठोर शिक्षा झाली नाही, तर समस्त जनता आणि महिला संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले असून, “न्याय मिळावा, नराधमाला फाशी व्हावी” हीच एकच मागणी सर्व स्तरातून होत आहे.



