🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी प्रतिक पांडे
नागपूर : जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र यांच्या विद्यमाने पत्रकारांचे ज्ञान, कौशल्य आणि व्यावसायिक क्षमता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने एकदिवसीय जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळा – २०२६ चे आयोजन आमदार निवास, नागपूर येथे उत्साहात पार पडले.
कार्यशाळेमध्ये बदलत्या काळातील पत्रकारितेचे स्वरूप, पत्रकारांसमोरील वाढती आव्हाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कायदेशीर बाबी, डिजिटल माध्यमांचा प्रभाव तसेच समाजाप्रती पत्रकारांची जबाबदारी या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मान्यवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. भूषणकुमारजी उपाध्याय(सेवानिवृत्त पोलीस महासंचालक तथा कमांडंट जनरल, गृहरक्षक दल) यांनी *”पोलीस विभागाची कार्यपद्धती, संबंधित कायदे आणि पत्रकारांची भूमिका”* या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पत्रकार हा पोलीस विभागाचा तिसरा डोळा आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांचे जनसंपर्क आणि पत्रकारांशी सुसंवाद असतो, त्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाते.”पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्याच्या तरुणांमध्ये वाढत असलेला ताण-तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक लेखनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या सेवाकाळातील अनेक अनुभव सांगताना पत्रकारांनी विविध प्रसंगी केलेल्या सहकार्याची उदाहरणे त्यांनी मांडली. साहित्य, कविता आणि तणावमुक्त जीवनशैलीबाबतचा त्यांचा अभ्यासही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
मा. विनोदजी रापतवार(जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर) यांनी *”अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमे आणि कायद्याची भूमिका”* या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, “पत्रकारिता ही मधाच्या पोळ्यासारखी असते; त्यामध्ये गोडवाही असतो आणि काटेही असतात. माध्यमांनी जनतेचे कायदेशीर वकील म्हणून काम केले पाहिजे.”पत्रकारांनी जबाबदारीने, कायद्याचे भान ठेवून आणि लोकहिताला प्राधान्य देत कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. मोइज़ मन्नान हक(सेवानिवृत्त विभागप्रमुख, मास कम्युनिकेशन अँड मीडिया, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांनी “डिजिटल पत्रकारिता व सोशल मीडियाचे वाढते महत्त्व”या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी सतत अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिच्या दोन्ही बाजूंची पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, “वातानुकूलित कार्यालयात बसून पत्रकारिता करता येत नाही; पत्रकाराने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष वार्तांकन केले पाहिजे.” त्यांनी देश-विदेशातील पत्रकारितेचे अनुभव कथन करत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारितेतील फरक स्पष्ट केला. पत्रकारितेत संयम, सातत्य आणि अद्ययावत ज्ञान ही यशाची त्रिसूत्री असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शामली निंबाळकर यांनी पत्रकारिता करीत असताना जोड व्यवसायाने उत्पन्न कसे निर्माण करायचे याबत माहिती दिली.
पराग जोशी जेष्ठ पत्रकार यांनी पत्रकारितेतुन जनसंपर्क फायदे व महत्व पटवून दिले.
शेखर सोनी जेष्ठ छायाचित्रकार यांनी वृतपात्रातील छायाचित्रचे स्थान, विविध पुरस्कार बाबत अनुभव सांगितला.
मा. शैलेंद्रजी साळे(संस्थापक अध्यक्ष, जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र) तसेच ॲड. प्रकाशजी जयसवाल (अध्यक्ष, बार कौन्सिल, नागपूर) यांनीही पत्रकारितेतील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. शैलेंद्रजी साळे यांनी पत्रकारांनी सत्य, निष्पक्षता आणि सामाजिक बांधिलकी जपत लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडावेत, असे आवाहन केले. बदलत्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून जबाबदार पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
प्रदेशाध्यक्ष देवानंदजी अहिरे यांनी पत्रकारांसाठी नियमित प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना रस्ता सुरक्षा आणि माध्यमांची सामाजिक जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी राज्य कार्याध्यक्ष युवराजजी देवरे संघटन वाढवा व संघटित राहा असे प्रतिपादन करीत उपस्थित मान्यवर, पत्रकार आणि आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाला जन ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष स्मिता नगराळे वर्धा जिल्हा, चंद्रपूरचेजिल्हाध्यक्ष गणेश लांजेवार, *अकोल्याचे जिल्हाध्यक्ष मिलिंद इंगळे, नागपूरचे उपाध्यक्ष सुनील मैदिले तसेच भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि नागपूर जिल्ह्यांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन मिलिंद इंगळे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन राज्य उपाध्यक्ष धर्मेंद्रजी पाटील,विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रतीकजी पांडे, विदर्भ समन्वयक सुरजितसिंग बाट, विदर्भ विभागीय सचिव सचिनजी बैस,महिला अध्यक्षा शितलजी नंदनवार, नागपूर जिल्हाध्यक्ष संजयजी तिवारी, महासचिव राजेशजी शुक्ला, महासचिव रुपेश नागदेवे तसेच जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या पत्रकारांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित पत्रकारांनी आयोजकांचे अभिनंदन केले आणि भविष्यातही अशा उपयुक्त व दर्जेदार पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.



