🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर : गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली आणि महाराष्ट्रात वाहतूक व विक्री करण्यास बंदी असलेली गोवा बनावटीची विदेशी दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणण्याचा डाव कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उधळून लावले. पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 1 कोटी 75 लाख 68 हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीची दारू, 20 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड ट्रक व 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट, असा एकूण 1 कोटी 95 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.
या कारवाईमुळे गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणून तिची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे.
⭐पोलिसांना मिळाली गोपनीय माहिती
कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख नीलोत्पल यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम सुरू होती.
दरम्यान, 16 ऑगस्ट 2026 रोजी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गोवा बनावटीची दारू भरलेला अशोक लेलँड ट्रक गोवा राज्यातून कर्नाटक मार्गे कोल्हापूरच्या दिशेने येत आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. ता. शिरोळ
जयसिंगपूर हद्दीत ट्रक अडवले
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. संशयित अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH-18-BG-0067 याची तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली.
पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव मुसफान ऊर्फ जावेद खान (रा. हरियाणा) असल्याचे सांगितले. त्यानंतर ट्रकची झडती घेतली असता दारूचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला.
⭐1,830 बॉक्समध्ये तब्बल 87,840 बाटल्या
पोलिसांच्या तपासणीत रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की कंपनीची 180 मिली क्षमतेची गोवा बनावटीची विदेशी दारू आढळली. एकूण 1,830 बॉक्समध्ये ही दारू भरलेली होती. प्रत्येक बॉक्समध्ये 48 नग याप्रमाणे तब्बल 87,840 बाटल्या आढळून आल्या.
प्रत्येक बाटलीची किंमत 200 रुपये प्रमाणे दारूची एकूण किंमत 1 कोटी 75 लाख 78 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ट्रक व मोबाईलही जप्त
दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अशोक लेलँड ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. तसेच आरोपीकडील व्हिवो कंपनीचा मोबाईल हँडसेट, किंमत 10 हजार रुपये, असा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
अशा प्रकारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 कोटी 95 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेद्वारे जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण दारू वाहतूक रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे? दारूचा साठा नेमका कोणासाठी आणला जात होता? तसेच या बेकायदेशीर व्यवसायाचे जाळे किती दूरपर्यंत पसरले आहे, याचा तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.
⭐मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता
इतक्या मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणण्यात येत असल्याने या प्रकरणामागे मोठे नेटवर्क असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दारू कोठून उचलण्यात आली, कोणाच्या सांगण्यावरून ट्रक रवाना झाला व महाराष्ट्रात कोणाकडे माल पोहोचविण्यात येणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईमुळे गोवा बनावटीच्या दारूची महाराष्ट्रात होणारी बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अनैतिक मानवी व्यापार व प्रतिबंधक कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे तसेच पोलीस अंमलदार उत्तम सडोलीकर, राम कोळी, अरविंद पाटील यांनी केली.



