प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; कारसह २ लाख १२ हजार ९६९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी — नारायण कांबळे
इचलकरंजी : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवणाऱ्या गुटखा तस्करावर शिवाजीनगर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वॅगन-आर कार असा एकूण २ लाख १२ हजार ९६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजता बंडगार माळ परिसरातील तारामाई पान शॉप तसेच वेताळ पेठ परिसरात पोलिसांनी कारवाई केली. महाराष्ट्रात गुटख्याच्या विक्रीवर प्रतिबंध असतानाही त्याची विक्री करण्यासाठी साठा केल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
कारमध्ये लपवून ठेवला होता प्रतिबंधित गुटखा
या कारवाईत विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा ६९ हजार १४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरलेली वॅगन-आर कार (क्रमांक एमएच ०४ डीएन ८२७९) अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीची असून तीही पोलिसांनी ताब्यात घेतली. दोन्ही मिळून २ लाख १२ हजार ९६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोघांना अटक; एक आरोपी फरार
या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, अब्दुल जब्बार पोटद्राचोला, वय ६०, रा. बंडगर मळा, इचलकरंजी , अमर मनोहर घडवीर, वय ४७, रा. वेताळ पेठ, इचलकरंजी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर दर्शन चौगुळे, रा. बोरगाव, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव हा आरोपी फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शिवाजीनगर पोलिसांची गुप्त माहितीवर कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलात्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेंमाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार पो.हे.कॉ, वाजीद मोमीन, सदाम मनदी, गणेश सनदी, शिरीष कांबळे, शितल गवळी तसेच महिला पोलीस अंमलदार प्रियंका चोगुले यांनी कारवाईत सहभाग घेतला.
या कलमांनुसार गुन्हा दाखल
शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी येथे संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न व सुरक्षा व मानदे अधिनियम २००६ चे कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ व २ यांना तपासकामी अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक आरती कणिरे करीत आहेत. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.



