🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी: मनोहर गोरगल्ले
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तपास पथक पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करत एका १९ वर्षीय तरुणाला धारदार तलवारीसह ताब्यात घेतले आहे.
आकाश नवनाथ लोखंडे (वय १९, रा. चिंचोशी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण उत्तर पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. या बातमीच्या आधारे पथकाने सापळा रचून कारवाई केली असता, आरोपी आकाश लोखंडे याच्याकडे विनापरवाना बाळगलेली एक धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील तलवार जप्त केली आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोरखांडे, तसेच पोलीस अंमलदार शिंदे, कोळेकर, ढमढेरे, लोखंडे, कोळी, जगजाफ आणि सांडभोर यांच्या पथकाने केली आहे.



