२० अधिकारी, १७० पोलीस अंमलदार, १४० होमगार्ड व एसआरपीएफ जवानांचा सहभाग
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मिरज शहर पोलिसांकडून गुरुवारी दमदार रूट मार्च काढण्यात आला. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून संचलन केले.जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या रूट मार्चमध्ये तब्बल २० पोलीस अधिकारी, १७० पोलीस अंमलदार, १४० होमगार्ड तसेच एसआरपीएफ जवानांनी सहभाग घेतला.शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, गणेश मंडळांचे परिसर आणि संवेदनशील भागातून पोलिसांनी संचलन करत सुरक्षा व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच संवेदनशील परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करावा, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.गणेशोत्सवात शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेशच या रूट मार्चमधून देण्यात आला.



