🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर :- मोका (MCOCA) गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या एका सराईत इसमाकडून कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विनापरवाना व बेकायदेशीर दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत राउंड असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी करवीर तालुक्यातील उचगाव हद्दीत करण्यात आली.
पोलिसांची गोपनीय कारवाई आणि सापळा
कोल्हापूर जिल्ह’यात अवैध शस्त्र बाळगणारे, विक्री, वाहतूक व तस्करी करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नीलोपल यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारींना दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विविध पथके तयार केली होती.
कारवाई दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील व संदीप सावंत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मोका गुन्ह्यातील संशयित निलेश उर्फ महादेव दिलीप काळे (वय ४१, रा. यादव नगर, राजारामपुरी, कोल्हापूर) याच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल असून तो ते विक्री करण्यासाठी उचगाव ते गडमुडशिंगी जाणाऱ्या रोडवर येणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकासोबत उचगाव हद्दीतील संबंधित मार्गावर सापळा रचला. संशयित निलेश काळे याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे:
दोन गावठी बनावटीचे पिस्तूल
चार जिवंत राउंड
एक मोबाईल फोन
असा एकूण १,१५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हस्तगत करण्यात आला.
पकडलेल्या संशयिताविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात ‘आर्म्स आक्ट’ (शस्त्र कायदा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोपल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, संदीप सावंत, शिवानंद मठपती, संतोष बरगे, प्रदिप पाटील, रविराज लंबे, महेंद्र कोरवी, सत्यजित सावंत, सत्यजित तानुगडे, सागर चौगले व अरविंद पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



