🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी- संजय दिंडे
कोल्हापूर:- शहरातील अवैध अंमली पदार्थ विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत एका तरुणाला रंगेहात ताब्यात घेतले आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचगंगा स्मशानभूमी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. उमेर समीर मेस्त्री (वय २३, रा. मराठा बँकेजवळ, सोमवार पेठ, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्ज, मोबाईल आणि शाईन मोटरसायकल असा एकूण २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पथके तैनात केली आहेत. पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम दुचाकीवरून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी पंचगंगा स्मशानभूमीजवळ येणार आहे. या माहितीच्या आधारे पथकाने परिसरात सापळा रचून संशयित उमेर मेस्त्री याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एमडी ड्रग्ज आढळून आले.
याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
पोलीस पथकाची धडक कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पाल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन आणि पोलीस अंमलदार विशाल खराडे, अशोक पोवार, प्रदिप पाटील, गजानन गुरव, दिपक घोरपडे, प्रविण पाटील, महेश आंबी, अरविंद पाटील व सतीश सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.



