🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – आनंद कांबळे
कोल्हापूर:- जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटविरोधात करवीर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत एका लॉज मालकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून गर्भलिंग निदानाच्या काळ्या व्यवसायावर पोलिसांनी मोठा घाव घातल्याचे मानले जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी विशेष पथक तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात २६ जुलै २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ९१,३१९,(२)३(५)तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३, महाराष्ट्र रुग्णशुश्रूषा नोंदणी अधिनियम कलम ३, ६, १२ आणि PCPNDT कायदा कलम ५, १८, २३ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
फरार आरोपींच्या शोधात पोलिस
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर र्थी स्टार लॉजचा मालक प्रदीप प्रकाश संकपाळ (वय ३६) याला प्लॉट क्रमांक ४७, जनाईदत नगर कळंबा, कोल्हापूर येथून अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, या लॉजचा वापर बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी केला जात असल्याचा संशय असून या रॅकेटमध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
करवीर पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह पोसई कळकुटे, पोसई सुहास पवार, सहा. फौजदार राहुल देसाई, पो.कॉ. सोमराज पाटील, पो.कॉ. लखण राजगुरू, पो.कॉ. महिला पोलिस अंमलदार रेखा माने, पो.कॉ. अविनाश कांबळे, योगेश शिंदे आणि श्रीधर जाधव यांनी सहभाग घेतला.
न्यायालयात हजर; पोलिस कोठडीची मागणी
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी पोलिस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरू असून जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही अशाच प्रकारचे अवैध गर्भलिंग निदान रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे



