‘कुरणे टोळी’ सांगली जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार; गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांचा इशारा
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अविनाश ऊर्फ रितेश शिवाजी कुरणे टोळीतील चार जणांना सांगली जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५५ अन्वये हा हद्दपारीचा आदेश जारी केला आहे.चार जणांवर तडीपारीची कारवाई
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये१) अविनाश ऊर्फ रितेश शिवाजी कुरणे (२४) – माणिकनगर, मिरज २) राहील राजू शेख (२४) – सध्या समतानगर, मिरज
३) राजेश चंदू गुजराती (२८) – माणिकनगर, मिरज
४) लतीफ ख्वॉजा शेख (२८) – सध्या गंगानगर, मिरज
यांचा समावेश आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीविरुद्ध २०२२ ते २०२६ या कालावधीत खुनाचा प्रयत्न, हत्याराने दुखापत, पिस्तुलाचा बेकायदेशीर वापर करून खुनाचा प्रयत्न, बंदी आदेशाचे उल्लंघन करून घातक हत्यार बाळगणे, चाकूचा धाक दाखवून अपहरण व खंडणीसाठी धमकी, मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आर्थिक फसवणूक अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चौकशीअंती पोलिसांचा कठोर निर्णय महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी या टोळीविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज उपविभाग यांच्याकडून चौकशी करण्यात आली. टोळीविरुद्ध दाखल गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाई, सद्यस्थिती आणि हालचालींचा विचार करून सुनावणी घेण्यात आली.
या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी टोळी प्रमुखासह चारही जणांना दोन वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला.
गणेशोत्सवात पोलिसांची करडी नजर आगामी गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात येणार असून, कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.



