🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी फहीम शहा
धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरोधात कारवाई करत एका संशयिताला गावठी पिस्तूल (देशी कट्टा), चार जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २७ जून २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सुमित सुभाष शिंदे (वय ३६, रा. सतिष नगर, देवपूर, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले. तो चारचाकी वाहनातून पांझरा नदी परिसरातील संत रोहिदास गार्डनजवळ येत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याची झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल (कट्टा) व चार जिवंत काडतुसे आढळून आली.
कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :
गावठी पिस्तूल (देशी कट्टा) – ₹४०,०००
४ जिवंत काडतुसे – ₹४,०००
चारचाकी वाहन (MH-18/BR-9103) – ₹८,००,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹८,४४,०००
प्राथमिक चौकशीत आरोपीने अंतर्गत वादातून वापरण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल व काडतुसे विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात घडू शकणारा गंभीर गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१५/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध यापूर्वीही धुळे शहर, देवपूर व आझादनगर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे तसेच त्यांच्या पथकाने केली.



