🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी-राजेंद्र पवार
मिरज : ब्राम्हणपुरी परिसरातील एका घरात घुसून चांदीच्या देवघरातील वस्तू व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सराईत महिला चोरटीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी गुन्हा क्र. २१९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत मकरंद हणमंतराव ग्रामोपाध्ये (वय ५६, व्यवसाय – वकील, रा. ब्राम्हणपुरी, मिरज) यांनी फिर्याद दिली आहे.
१२ जून २०२६ रोजी दुपारी २.३० ते ३.४५ या वेळेत अज्ञात महिलेने ग्रामोपाध्ये यांच्या घराचा उघडा दरवाजा पाहून घरात प्रवेश केला. देवघरातील ८ तोळे वजनाचे चांदीचे सिंहासन, ४ तोळे वजनाच्या चांदीच्या पादुका आणि १,००० रुपये रोख, असा एकूण २४,९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
घटनेनंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी प्रभा दत्तात्र्य महाडीक (वय ८३, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हिला मिरज एसटी स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेने चोरीची कबुली दिली असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित महिला सराईत व रेकॉर्डवरील चोरटी असून तिच्याविरुद्ध सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.



