🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी-राजेंद्र पवार
मिरज:- मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शानुर करीम मुजावर (वय ३८, रा. चौगुले मळा झोपडपट्टी, म्हैशाळ रोड, मिरज) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांच्या आदेशानुसार आरोपीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अंतर्गत १९ नोव्हेंबर २०२५ पासून एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तो २८ जून २०२६ रोजी रात्री चौगुले मळा, म्हैशाळ रोड परिसरात त्याच्या राहत्या घराजवळ आढळून आला.
याबाबत गुप्त माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २३५/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे तसेच मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वी कुपवाड एमआयडीसी व मिरज शहर पोलीस ठाण्यात खून, मारामारी, जबरी चोरी, धारदार शस्त्र बाळगणे यांसारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



