🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी : संजय दिंडे
कोल्हापूर :- दुचाकीच्या डिक्कीतून रोकड चोरी करणाऱ्या एका सराईत आंतरराज्य गुन्हेगाराला अटक करण्यात जुना राजवाडा पोलिसांना मोठे यश आले आहे. संतोश हनमंत कटटीमणी (वय ४१, रा. निंबाळ, ता. इंडी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५,००० रुपयांचा मोबाईल, ४,०७० रुपयांची रोकड आणि चोरीसाठी वापरलेला एक टेस्टर असा एकूण ९,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटना आणि पोलिसांची धडक कारवाई
दिनांक १९ जून २०२६ रोजी सकाळी शिगोशी मार्केटमधील फिर्यादी संतोष दिगंबर शिंदे यांच्या मोपेड (स्कूटर) च्या डिग्गीतून रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अमर पाटील आणि प्रशांत धोलप हे २६ जून २०२६ रोजी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, भेंडे गल्ली गुजरी येथे एक संशयास्पद इसम मोपेड गाड्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
गुन्ह्याची कबुली आणि आंतरराज्य कनेक्शन
पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लहान टेस्टर मिळून आला. संशय बळावल्याने त्याची कसून चौकशी केली असता, त्याने १९ जून रोजी शिगोशी मार्केट येथे मोपेडची डिग्गी टेस्टरने उचकटून रोकड चोरल्याची कबुली दिली. तसेच गेल्या वर्षी (६ नोव्हेंबर २०२५ रोजी) कासार गल्ली गुजरी येथून एका मोपेडच्या डिग्गीतून ९८,४०० रुपये चोरल्याचेही त्याने मान्य केले.
आरोपी संतोश कटटीमणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गोवा आणि कर्नाटक राज्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत:
कारवार पो. ठाणे (कर्नाटक): उघड्यावरील रोकड रक्कम चोरी (२०२३)
म्हापसा पो. ठाणे (गोवा): गाडीच्या डिक्कीतून सोन्याची चेन चोरी (२०२१)
फतोर्डा पो. ठाणे (गोवा): उघड्यावरील मोबाईल चोरी (२०२१)
ही कामगिरी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, पोलीस अंमलदार अमर पाटील, प्रशांत धोलप, सागर डोंगरे, प्रविण सावंत, प्रशांत पांडव, मोहन लगारे, स्वप्निल कांबळे आणि प्रितम सूर्यवंशी यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत धोलप करत आहेत.



