हॉटेलबाहेरचा वाद जीवघेणा ठरला; डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या,
शहापूर पोलिसांनी आणि कोल्हापूर LCB नी संयुक्त धडाकेबाज कारवाई; यड्राव येथील हत्येचा अवघ्या २४ तासांत छडा.
🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
इचलकरंजी : यड्राव (ता. हातकणंगले) येथील पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील हॉटेल ऑकॅड बाहेर झालेल्या वादात मॅनेजरच्या डोक्यात दगड घालून मारहाण करून त्याची हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्याचा शहापूर पोलिसांनी आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी शाहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४३४/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमधील हॉटेल ऑकॅर्ड इंटरनॅशनल बार अँड रेस्टॉरंट परिसरात हा प्रकार घडला. यातील मृत व्यक्ती अल्बर्ट हॅरीबेनी अब्रोस (वय ५३, रा. समता नगर, ता.मिरज) हा संबंधित हॉटेल ऑकॅडमध्ये मॅनेजर म्हणून काम करीत होता.
हॉटेलबाहेर एका महिलेशी आरोपींचा वाद झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. हा वाद सुरू असताना मृत अल्बर्ट याने मध्यस्थी करून आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी वाद अधिकच चिघळला. आरोपींनी अल्बर्ट याच्याशी मारामारी करत त्याच्या डोक्यात दगडाने जोरदार प्रहार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर आणि शहापूर पोलिस ठाण्याच्या पथकांनी समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील माहिती, साक्षीदारांकडून मिळालेली माहिती आणि तपासाच्या विविध बाबींच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलिसांना आरोपींच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. पोलिस पथकाने जयसिंगपूर ते अंकली टोल नाका येथुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणातील अटक आरोपी गंगा प्रवीण पाटील (वय २०, रा. बेघर वसाहत, यड्राव) आणि आशफाक सिकंदर नदाफ (वय २३, रा. जामा मशीदसमोर, खोतवाडी, ता. हातकणंगले) अशी आहेत.
ही कारवाई कोल्हापूर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, शहापूर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, जालंदर जाधव, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, उदय पाटील, संतोष कांबळे, रोहित डावाळे, सतीश कुंभार, बबन माळी, अभिजित कांबळे, संतोष बर्गे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, सत्यजित तानगुडे यांच्यासह शहापूर पोलिस ठाणे व कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पुढील तपास शहापूर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत. या हत्येमागील नेमका घटनाक्रम, वादाचे कारण आणि या प्रकरणातील इतर बाबींचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.



