🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर :- ता. हातकणंगले हुपरी येथे जवाहर साखर कारखाना ते कारदगा जाणारे रोडवर आरटीआय कार्यकर्ते अशोक बाजीराव खाडे यांना लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण करणाऱ्या ३ सराईत आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) जेरबंद केले आहे.
दिनांक ०६/०९/२०२६ रोजी सायंकाळी ५.४० वाजता अशोक खाडे हे पायी जात असताना, पाठीमागून आलेल्या चारचाकी पांढऱ्या रंगाच्या वाहनातून उतरलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात खाडे यांच्या उजव्या खांद्यावर व दोन्ही पायांवर गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ११८(२), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
LCB ची धडक कारवाई व आरोपींना बेड्या
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना समांतर तपासाचे आदेश दिले. एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे मिळालेल्या बातमीनुसार, तपोवन मैदान येथून ३ आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. जयकुमार भारत ढंग (वय २८, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) – या आरोपीवर जूना राजवाडा पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
२. अभिजित बाळासो पाटील (वय ३४, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर)
३. फिरोज उर्फ साजिद अल्लाबक्ष शेख (वय २५, रा. सरनाईक वसाहत, कोल्हापूर)
पैशांच्या व्यवहारातून सुपारी देऊन हल्ला
संशयित आरोपी अमृत सावंत (रा. सांगली) याच्यासोबत पीडित अशोक खाडे यांचे पैशांच्या व्यवहारावरून वितुष्ट आले होते. याच रागातून अमृत सावंत याच्या सांगण्यावरून आणि त्याच्याच बलेनो कारमधून जाऊन आरोपींनी हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे.
कारवाईत सहभागी एलसीबी पथक व हुपरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी हुपरी पोलिसांच्या स्वाधीन केले असून फरार आरोपी अमृत सावंत याचा शोध सुरू आहे.



