🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
सांगली:- मिरज-कुपवाड महापालिका प्शासनाच्या दिरंगाईवर प्रगणकांचा संताप; प्रलंबित मानधन तातडीने जमा करण्याची मागणी
सांगली : जनगणना २०२६ च्या पहिल्या टप्प्यात कडक उन्हाची पर्वा न करता नागरिकांच्या घराघरांत जाऊन दिवस-रात्र जनगणनेचे काम करणाऱ्या प्रगणकांना आता त्यांच्या मानधनासाठी प्रशासनाच्या दारात पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील अनेक प्रगणकांचे मानधन अद्याप प्रलंबित असल्याने प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जनगणनेच्या कामादरम्यान प्रगणकांनी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून तब्बल ३४ प्रश्नांची माहिती संकलित केली. नागरिकांकडून माहिती घेताना अनेकदा प्रश्नोत्तर, वाद-विवाद तसेच विविध अडचणींचा सामना करावा लागला. काही प्रगणकांना या काळात अपघातांनाही सामोरे जावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाही प्रशासनाने दिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रगणकांनी अतिरिक्त मेहनत घेत जबाबदारी पार पाडली.
कामासाठी दबाव; मानधनासाठी मात्र विलंब?
जनगणनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रगणकांवर सातत्याने दबाव असल्याची तक्रार आहे. दिलेल्या मुदतीपूर्वीच काम पूर्ण करून देणाऱ्या प्रगणकांना आता मानधनासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागत असल्याने, “काम करून घेताना घाई आणि दबाव; मग मानधन देताना एवढी दिरंगाई का?” असा सवाल प्रगणकांकडून उपस्थित केला जात आहे.
इतर ठिकाणी मानधन जमा; सांगली-मिरजेत प्रतीक्षा
प्रगणकांच्या म्हणण्यानुसार, बाहेरील काही तालुके व जिल्ह्यांमध्ये जनगणना कर्मचाऱ्यांचे मानधन ऑगस्टपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सांगली-मिरज परिसरातील अनेक प्रगणकांना अद्याप मानधन मिळाले नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मानधनाबाबत प्रगणकांकडून महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, “हे आमचे काम नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा,” अशा प्रकारची उत्तरे मिळत असल्याची तक्रार प्रगणकांनी केली आहे. त्यामुळे एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे पाठविले जात असल्याची भावना प्रगणकांमध्ये निर्माण झाली आहे.
“जनगणनेच्या वेळी प्रगणकांची आठवण; मानधनाच्या वेळी जबाबदारी झटकली” “जनगणनेचे काम करून घेताना प्रगणकांची आठवण होते; मात्र मानधन देण्याची वेळ आली की जबाबदारी झटकली जाते,” अशी संतप्त भावना प्रगणकांनी व्यक्त केली आहे.मानधन न मिळाल्यास आगामी कामांवर बहिष्काराचा इशारा प्रलंबित मानधन तातडीने जमा न झाल्यास पुढील जनगणना प्रशिक्षण तसेच आगामी जनगणनेच्या कामांवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्रगणकांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.प्रशासनाने प्रगणकांच्या अडचणींची दखल घेऊन प्रलंबित मानधनाबाबत तातडीने कार्यवाही करावी, मानधन त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे आणि विलंबाचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी प्रगणकांकडून करण्यात आली आहे.दरम्यान, मानधनाचा प्रश्न लवकर निकाली न निघाल्यास प्रगणकांचा असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



