🚨DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – आनंद कांबळे
कोल्हापूर :- सार्वजनिक बांधकाम विभाग, शाहुवाडी येथील शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे (वय ५०) यांना कामाचे बिल मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी), कोल्हापूरच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निघणारी रस्ते, गटारे आणि पुलांची कामे मुख्य
ठेकेदारांकडून सब-ठेकेदार म्हणून पूर्ण करून देतात. त्यांनी शिराळे-वारूण पुलाचे काम तसेच कर्नाळवाडी (धनगरवाडा) ते सोनारवाडी (विरळे) रस्ता या कामांची अंमलबजावणी केली होती. या दोन्ही कामांची बिले मंजूर करून दिल्याच्या बदल्यात शाखा अभियंता विजयकुमार वनमोरे यांनी सुरुवातीला ३४ हजार ७०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी एसीबी, कोल्हापूरकडे केली होती. त्यानंतर एसीबीने केलेल्या पडताळणीत वनमोरे यांनी लाचेची रक्कम वाढवून ३८ हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदारांकडून ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता विजयकुमार वनमोरे यांना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणी आरोपी विजयकुमार विलास वनमोरे यांच्याविरुद्ध शाहुवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस हवालदार विकास माने, पोलीस हवालदार संदीप काशीद, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



