*काळ बदलतो आहे, संपर्कमाध्यमे बदलता आहेत तसे आचार विचार देखील बदलतील. नवी पिढी आपल्या आयुष्याची व्याख्या स्वत: करू पाहील तेव्हा केवळ अशा घटनांकडे बोट दाखवून नव्या पिढीला थांबवता येणार नाही. उलट यांमुळे त्यांची घुसमट वाढून नव्या विकृती जन्माला येतील.*
दर्शना पवार या गुणी मुलीची हत्या होऊन आता आठवड्यापेक्षा मोठा कालावधी उलटला आहे. तिचा खून करणारा तिचा मित्र राहुल हंडोरे सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देत असला तरी पोलिसांनी त्याला शिताफीने आपल्या ताब्यात घेतले. राजगड येथे पोलिसांना तपास करताना माहिती मिळाली आणि तपासाची चक्रे जोरदार फिरु लागली. मात्र, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यानंतर तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आता या प्रकरणातील अनेक कांगोरे उलगडले जाऊ लागले आणि लोकांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडला. आज एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्यास सज्ज असलेली दर्शना पवार ही दुर्दैवाने आपल्यात नाही. त्यामुळे तिची बाजू आपल्यापर्यंत कधीच येणार नाही. मात्र ही घटना समाजाला विचार करण्यास प्रवृत्त करणारी अशी घटना आहे. एकीकडे मुलीला घरात कोंडून ठेवणे यांसारखी विचारसरणी यानिमित्ताने डोके वर काढतांना दिसते आहे तर दुसरीकडे या तरुण तरुणींना आपले स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटते.
या दुर्दैवी अशा प्रकरणातील मृत दर्शना पवार आणि तिचा मारेकरी राहुल हंडोरे हे एकमेकांना बालपणापासून ओळखत होते त्यातूनच त्यांची मैत्री झाली. दोघेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे. राहुल याचे दर्शनावर प्रेम होते. मात्र, आपले प्रेम आपल्यापासून दूर जातेय, असं वाटू लागल्याने राहुल हा नाराज होता. त्याला दर्शनाबरोबर लग्न करायचे होते. मात्र, दर्शना हिच्या घरच्यांकडून या लग्नाला तीव्र विरोध होता. तसेच दर्शना एमपीएससी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आणि घरच्यांनी तिच्या लग्नाची बोलणी सुरु केली. याची माहिती मिळताच राहुल हंडोरे हा अधिक अस्वस्थ होता. दर्शनाचा एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर ठिकठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अशाच एका सत्कार समारंभानंतर राहुलने दर्शनाला बाईकवरुन ट्रेकिंग साठी राजगडावर नेले. पण तेथेच दर्शनाचा घात झाला. तेथे राहुलने नकार मिळाल्याच्या संतापातून तिला कायमचे संपवले. तेथून तो एकटाच राजगडावरुन खाली आला आणि बाईकवरुन तो पसार झाला. सकृतदर्शनी हा खून रागाच्या भरात केला असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण जितक्या शांतपणे तो आपल्या वाहनाने तिथून निघून जातो त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहून लक्षात येते.
राहुल हंडोरे हा दर्शना पवारचा चांगला मित्र होता आणि दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने राहुलने थेट दर्शनाला संपवलेच. असले संतापजनक कृत्य करणारा राहुल हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. म्हणजे एक शिक्षित तरुण जो स्वत:ला भावी आयुष्यात अधिकारी म्हणून बघतो त्याने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपल्या मैत्रिणीचा नकार मिळाल्यावर थेट तिचा जीव घ्यावा. यामागे खुन्याची असलेली मानसिकता ही काही अपवादात्मक नाही. सध्या खून प्रकरणांमध्ये थंड डोक्याने होत असलेले खून पाहिले की समाज म्हणून आपण प्रगती करतो आहोत या समजाचा मागमूस दिसत नाही. या प्रकरणात देखील अशीच काही शंका घ्यायला जागा आहे. एका निर्जन स्थळी आपल्या मैत्रिणीला घेऊन तिच्या जीवावर उठणारा हा प्रियकर विश्वासघात करत जेव्हा तिचा खून करतो तेव्हा तो कुठल्याही दयेस पात्र ठरत नाही.
सध्या समाजात लिंग भेदभाव कमी होतांना दिसतो आहे. हे प्रमाण अगदी आश्वासक नसले तरी पुरुषप्रधान संस्कृतीला बऱ्यापैकी तडे गेलेले बघायला मिळतात. परिणामी मुलं-मुली एकमेकांशी थेटपणे बोलतात, मैत्री करतात. यांत काही वावगे देखील नाही. मात्र समाजमाध्यमांवर नैतिकतेचे डोस देणारे अनेक जण जेव्हा दर्शना पवार आता आपल्यात नाही,तिची हत्या झाली आहे हे माहिती असून देखील तिच्या वागणूकीसंदर्भात प्रश्न निर्माण करत आहे. जी दुर्दैवी मुलगी आपली बाजू आता मांडू शकत नाही तिच्याविषयी बोलतांना मर्यादा पाळल्या पाहिजेत याचे भान सुद्धा हरपलेले असल्याचे यानिमित्ताने ठळकपणे दिसून आले. समाज हा काळानुसार सतत बदलत असतो, काळ, स्थळ, संस्कृती, विचार जसे बदलतात तश्या नैतिकतेच्या व्याख्या देखील बदलत जातात तेव्हा मुला-मुलींनी भेटूच नये, म्हणजे असले प्रकार काही उद्भवणारच नाहीत. असा भोळसट समज करून घेऊन अनेक जण बोलतांना दिसतात. काळ बदलतो आहे, संपर्कमाध्यमे बदलता आहेत तसे आचार विचार देखील बदलतील. नवी पिढी आपल्या आयुष्याची व्याख्या स्वत: करू पाहील तेव्हा केवळ अशा घटनांकडे बोट दाखवून नव्या पिढीला थांबवता येणार नाही. उलट यांमुळे त्यांची घुसमट वाढून नव्या विकृती जन्माला येतील. तेव्हा असले दुर्दैवी कृत्य टाळायचे असतील तर जुन्या पिढीला नव्या पिढीला विश्वासात घेऊन सातत्यपूर्ण संवाद साधत त्यावर मार्ग काढावा लागेल. अन्यथा संपर्काची इतकी साधने असून देखील तरुणाईचा जो मानसिक कोंडमारा होतांना दिसतो त्यातून या विकृती पुढे येतात आणि जगातील चांगल्या वाईट गोष्टी कळण्याआधीच स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या जीवाला संपवण्याचा प्रयत्न करतात.



