DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- अमर मोकाशी

भिवापूर :- महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक, हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा अवमान करण्याचे धाडस काही समाजकंटकांनी करून दाखवले आहे. ९ ऑगस्टच्या मध्यरात्री, शहराच्या मध्यवर्ती आझाद चौकातील महाराजांच्या पायथ्याशी असलेली नामफलकाची दगडी पाटी कुऱ्हाड आणि लोखंडी सळाखीने उखडून फेकण्यात आली. सकाळी हा प्रकार उघड होताच नागरिकांच्या संतापाचा ज्वालामुखी फुटला आणि भिवापूर शहरात संतापाची लाट उसळली.
ही केवळ एक दगडी पाटी मोडण्याची घटना नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेवर, शौर्यावर आणि अभिमानावर केलेला थेट प्रहार आहे. या प्रकारामुळे शहरातील वातावरण तापले असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संतप्त नागरिकांसह पोलिस ठाण्यावर धडक देत आरोपींना त्वरित गजाआड करण्याची मागणी केली. भाजप शहराध्यक्ष अनिल समर्थ, आनंद गुप्ता, जिल्हा महामंत्री हिमांशू अग्रवाल, महामंत्री जावेद कुरेशी, अनिल निखारे, युवा मोर्चा अध्यक्ष धनंजय चौधरी, वैशाली पेंदाम, सुचिना लोनगाडगे, मंगला जांभुळकर, शाहुल ढोणे, रमेश नक्षीणे, रमेश भजभुजे, रमेश नागपुरे, हंसराज जनबंधू, अकुंश शंभरकर, युवराज करनुके तसेच शिवसेना तालुका प्रमुख रुपेश गिरडे, सुनील मैदिले, रीना बांडेबूचे आदींनी ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी ठाम मागणी केली.
भाजप तर्फे निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आली असून, हा प्रकार घडवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चोख तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपाधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड वृष्टी जैन यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले – “स्मारकाचा अपमान करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत आणि लवकरच आरोपी गजाआड केले जातील.”
सदर स्मारक वर्ष २०२२-२३ मध्ये तत्कालीन आमदार राजु पारवे यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आले होते. पायथ्याशी आमदारांचे नाव व योजनेचा तपशील असलेली दगडी पाटी बसवण्यात आली होती. हाच नामफलक फोडून शहराच्या शांततेला तडा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सध्या भिवापूर शहरात तणावाचे वातावरण असून, नागरिक, राजकीय नेते आणि सामाजिक संघटना एकाच सुरात आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत आहेत. पोलिसांच्या हालचालींवर संपूर्ण जिल्ह्याचे डोळे खिळले असून, हा प्रकार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत नागरिक शांत बसणार नाहीत, असा इशारा संतप्त जनतेने दिला आहे.



