DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री: साक्री तालुका कृषी कार्यालयात लाचलुचपत प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम चौरे (वय ४५, रा. पिंपळनेर) आणि कंत्राटी डाटा ऑपरेटर रिजवान शेख (वय २३, रा. पोळा चौक, साक्री) यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याच्या नावे पन्हाळीपाडा (ता. साक्री) येथील शेतजमिनीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या रकमेच्या मोबदल्यात दोन्ही आरोपींनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती. त्यापैकी सात हजार रुपये स्वीकारताना सोमवारी (दि. १ सप्टेंबर) ही कारवाई करण्यात आली.
तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल यांनी पंचांसमक्ष पडताळणी करून सापळा रचला होता. कारवाईदरम्यान आरोपींना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या देखरेखीखाली पार पडली. पथकात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे, तसेच पोहेकॉ राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पोकॉ मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पोहेका सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींचा समावेश होता.



