DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पुणे,खेड : नगरपालिकेच्या यशाची हवा डोक्यात गेल्याचा फटका खेड तालुक्यात शिंदे गटाला बसल्याचे चित्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. “आम्हीच राजे” या आविर्भावात वावरणाऱ्या तालुक्यातील नेत्यांना आणि जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांना मतदारांनी जमिनीवर आणले असून, पक्षांतर्गत असलेल्या ‘घरभेदी’ राजकारणामुळे धनुष्यबाणाची पुरती वाताहत झाली आहे.
नगरपालिकेचे यश ठरले ‘भुलभुलैया’
नगरपालिकेत मिळालेल्या यशामुळे शिंदे गटाचे नेते प्रचंड हवेत गेले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना आपल्या ‘अतुलनीय’ कामगिरीचा विसर पडला. प्रत्येक गटात जिल्हाप्रमुख आणि स्थानिक नेत्यांची भूमिका वेगवेगळी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. आश्चर्य म्हणजे, शिंदे गटाची संपूर्ण यंत्रणा ही प्रत्यक्षात ‘घड्याळाच्या’ दावणीला बांधलेली होती की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गटागटांतील ‘फिक्सिंग’चा खेळ उघड?
तालुक्यातील विविध गटांतील विसंगती पाहून हा पराभव नैसर्गिक नसून ‘नियोजित’ वाटत आहे:
वाफगाव गट: येथे धनुष्यबाणाचे हक्काचे पंचायत समिती सदस्य चक्क राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसले. नेत्यांच्या धरसोड वृत्तीमुळे धनुष्यबाणाची हक्काची जागा हातातून गेली.
पिंपळगाव गट: या गटात एका ‘रील स्टार’ला उमेदवारी देऊन पक्षाची सर्व रसद पुरवण्यात आली. मात्र, ही रसद अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या यंत्रणेला बळ देण्यासाठी वापरली गेल्याची चर्चा आहे.
आळंदी ग्रामीण: येथे तर विचित्रच समीकरण पाहायला मिळाले. पंचायत समितीचा उमेदवार देऊन जिल्हा परिषदेसाठी मात्र ‘मशाल’ (ठाकरे गट) उमेदवाराला उघड मदत करण्यात आली. धनुष्यबाणाचे नेते ‘मशाल’ पेटवण्यासाठी सरसावल्याने निष्ठावान कार्यकर्ते अवाक झाले आहेत.
खराबवाडी, पाईट व काळूस गट: या महत्त्वाच्या गटांमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांना साधा चार आकडी मतदानाचा टप्पाही गाठता आला नाही. पाईट गटात तर ‘बुट्टेंना’ पाडण्याची शपथ घेतलेले नेते स्वतःच्या घरच्यांना निवडून आणण्यासाठी ‘अतुलनीय’ तडजोडी करण्यात व्यस्त होते…
कडूस गट: शेजारील कडूस गटात ‘घनवट’ पाडण्याचा विडा उचललेले ‘अतुलभाऊ’ थेट घड्याळासाठी मत मागताना दिसले, पण मतदारांनी हे दुतोंडी राजकारण मतदारसंघापूर ते नव्हे तर तालुक्यात सपशेल नाकारले.
जिल्हाप्रमुखांची ‘एकाकी झुंज’ की ‘सोयीची शरणागती’?
एककीकडे भगवान पोखरकर हे एकाकी झुंज देत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्येक गटात त्यांची बदलणारी भूमिका संशयास्पद ठरली आहे. मुळात राष्ट्रवादी जर जिल्हा परिषदेत कायम सत्तेत असते, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका करण्याचा मुद्दा येतोच कुठे? असा सवाल विचारला जात आहे.
नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा!
पक्षाची रसद घेऊन दुसऱ्या पक्षाचे काम करणे, हक्काच्या जागांवर डमी उमेदवार उभे करणे आणि वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाची प्रतिमा मलिन करणे यामुळे खेडमध्ये शिंदे गटाची मोठी नाचक्की झाली आहे. या दारूण पराभवामुळे आता शिवसैनिकांमधून एकच सूर उमटत आहे – “धनुष्यबाणाचा हा पराभव स्वीकारून जिल्हाप्रमुख आणि तालुक्यातील जबाबदार नेत्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
अशी मागणी सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांकडून होत आहे.



