DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : पिंजारझाडी ता.साक्री जि.धुळे येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या २२ वर्षीय तरुणास १३ ते १४ जणांकडून हाता बुक्क्यानी मारहाण करीत खून झाल्याची घटना घडली आहे. रामचंद्र उत्तम साबळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पिंजारझाडी ता.साक्री येथे घरकुलाच्या यादीत नावे नसल्याच्या कारणावरुन १४ जणांनी गावाच्या महिला सरपंचाच्या सासऱ्यांना हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाचा गळा दाबून लाथाबुक्यांनी मारहाण करून खून केला. तसेच कारची तोडफोड करण्यात आली. या प्रकारास पोलीस पाटलाने फूस दिली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात १५ जणांविरुध्द खूनासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
यासंदर्भात, शिंदखेडा येथील गोविंदनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले रामचंद्र उत्तम साबळे (५२) रा. अंबापूर रोड साक्री, मूळ रा. पिंजारझाडी, ता. साक्री, यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची सून शितल विनीत साबळे या सन २०२२ पासून पिंजारझाडी गावाच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. दि.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रामचंद्र साबळे हे मोटारसायकल (एमएच १८/बीपी- ७३७३) ने पिंजारझाडी गावात आले. ते डीके हॉटेलजवळ पोहचले असता तेथे पिंजारझाडी गावातील ग्रामस्थ आधीपासून उपस्थित होते. त्यावेळी गावातील सुहास मंगेश गायकवाड, जितेंद्र छोटीराम बागूल, राकेश लक्ष्मण गावीत, मयूर दिलीप गावीत, तुषार दिलीप गावीत, अशोक वामन गावीत, कांतीलाल रमेश गावीत, रतीलाल रवींद्र गावीत, प्रकाश सुभाष गावीत, प्रवीण महादु बागूल, लहू वामन गावीत, नितीन संजय महाले, झुलु देविदास गावीत, कन्हैयालाल संजय जगताप हे १४ जण देखील रामचंद्र साबळे यांच्याजवळ आले. त्यातील राकेश लक्ष्मण गावीत हा त्याच्या मोटारसायकलीने आला होता. त्याने आमच्या घरकुलाची नावे का मंजुर केली नाही, अशी विचारणा करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घरकुलाच्या विषयावरुन वरील १४ जणांनी रामचंद्र साबळे यांना हाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच रामचंद्र साबळे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या इनोव्हा कारची तोडफोड केली. तेव्हा गावातील काही ग्रामस्थ भांडण सोडविण्यासाठी आले. त्यात शुभम भिमराव गवळी (२२) हा देखील भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यास वरील १४ जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्याचा गळा दाबून छातीत मारहाण केल्याने तो बेशुध्द झाला. शुभम यास सुभाष धुडकू बागूल यांच्या वाहनातून गावातील डॉक्टरांकडे नेले. मात्र, त्यांनी त्यास पुढील उपचारासाठी साक्री येथे नेण्यास सांगितले. शुभमला साक्री येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तेथील वैद्यकीय अधिकारी रिना साहु यांनी तपासून शुभमला मृत
घोषीत केले. या घडलेल्या प्रकारास पोलीस पाटील योगेश गोरख बागूल याने वेळोवेळी फूस दिल्याचा आरोप रामचंद्र साबळे यांनी फिर्यादीत केला आहे. यावरुन वरील १५ जणांविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ कायदा कलम १०३ (२), १८९, १९०, १९१ (१), १९२, १९४, ३५२, ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उप विभागीय अधिकारी संजय बांबळे, प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागूल यांनी भेट दिली. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित राकेश लक्ष्मण गावीत (४२), योगेश गोरख बागूल (३१) या दोघांना दि.२९ रोजी रात्री १२.२० वाजता अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास शेवाळे करीत आहेत.