DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🗞️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्ना शिवाय पर्याय नाही म्हणून विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नरत राहून यशाचा मार्ग अनुसरावा असे मत विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. एल. तोरवणे यांनी व्यक्त केले.
विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री जि. धुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या नागाई माता मंदिर परिसर येथे विशेष हिवाळी श्रमानुभव शिबिराच्या समारोप प्रसंगी ते समारोकर्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे होते. प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप राठोड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा सुरेंद्रसिंग मगर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती वाकोडे, प्रा. रवींद्र मोरे, खांडबारा महाविद्यालयाचे प्रा. समिधा गांगुर्डे, प्रा. बोधीपाल लोंढे उपस्थित होते.
डॉ. डी. एल. तोरवणे बोलताना पुढे म्हणाले की, व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वच अपेक्षा पूर्ण होत नसल्या तरी, आयुष्यात प्रसंगी तडजोड करून मार्गक्रमण करणे गरजेचे असते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून ग्रहण केलेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडते, त्याचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करावा असा देखील सल्ला त्यांनी प्रसंगी दिला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी सदर श्रमानुभव शिबिरात विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. सध्याच्या युगातला तरुण मोबाईल आणि विविध समाज माध्यमांच्या आहारी जात असताना, महाविद्यालयातील रासेयो चे स्वयंसेवक या शिबिरात सर्वार्थाने सहभागी होतात हे कौतुकास्पद असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
नागाई माता मंदिराच्या पावन परिसरात सात दिवस चाललेल्या या शिबिराची प्रमुख थीम “युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटलसी” ही होती. सदर शिबिराच्या दरम्यान बेटी बचाओ बेटी पढाओ, सिकल सेल, अवयव दान, स्वच्छ भारत अभियान, आपत्ती व जल व्यवस्थापन इत्यादी विषयी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. गावातील नागरिकांची आरोग्य विषयक तपासणी आणि सुदृढ आरोग्य व संक्रमित रोगांविषयी जनजागृती देखील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. सदर कार्यक्रमात कुणाल सावळे, देवश्री बागुल, कोमल भोसले, मेघा पाटील, विशाखा भामरे, वेदश्री माळी या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून अनुभव कथन केले. सदर समारोपाच्या कार्यक्रमाचे संचालन कु. रिया ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन कु. आनंदी देसाई हिने व्यक्त केले. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ प्रदीप राठोड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा सुरेंद्रसिंग मगर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती वाकोडे, गौतम बच्छाव व सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.