DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी साकिब सैय्यद
पिंपळनेर (धुळे): साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साखरपुड्याचा आनंद सुरू असतानाच गुजर समाजातील भाऊबंधांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. या भीषण हाणामारीत तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत गुजरात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन आरोपींना फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी सर्व नातेवाईक एकत्र जमले होते. कार्यक्रम सुरू असतानाच गुजर समाजातील भाऊबंधांमध्ये जुन्या कारणावरून किंवा घरगुती वादातून वादावादी सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर थेट खूनी हल्ल्यात झाले. या राड्यात तिघांचा जीव गेला असून लग्नाचा मांडव शोकसागरात बुडाला आहे.
मृतांची नावे:
१. सुरेश गोसावी (वय ५० वर्षे)
२. साहिल गोसावी (वय ३५ वर्षे)
३. देवेंद्र पवार (वय ३६ वर्षे)
पोलिसांची ‘फिल्मी’ कारवाई: ओटाबरी घाटात ठोकल्या बेड्या
घटनेनंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ब्रेझा कारने गुजरातच्या दिशेने पलायन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली. आरोपी गुजरात बॉर्डरवरील ओटाबरी घाटातून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांची मदत घेतली.
पोलिसांनी स्थानिक रहिवाशांना गाडीचा नंबर देऊन घाटात ट्रॅफिक जॅम (रस्ता रोको) करायला सांगितले. गाड्यांच्या रांगेत अडकलेल्या आरोपींना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
- कांतीलाल गोसावी (वय ४२, रा. सोनगड, गुजरात)
- जसवंत गोसावी (वय ३६, रा. सोनगड, गुजरात)
- यांच्यासह कार चालकदेखील पोलिसांच्या ताब्यात आहे.
सद्यस्थिती
सध्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. सध्या परिसरात शांतता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



